तू मला खूप आवडतेस.
खूप म्हणजे अगदी मांजरीपेक्षा जास्त आवडतेस.
मांजर चोरून दूध पीते. तू चोरून दूध पीत नाहीस.
तू उघडपणे दूध पीतेस. आणि मला देत नाहीस.
कारण मी पीत नाही.
( म्हणजे..................... दूध पीत नाही. दारू पीतो. )
मी कधी कधी दारू पीतो. तरीही तुला वाटतं की मी रोज दारू पीतो.
पण मी गेल्या महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी दारू प्यायलो नव्हतो
( कारण तू माझे पाकीट लपवून ठेवलं होतं ).
हे तू अनवधानाने विसरलीस.
तुला माझा खूप राग येतो.
खूप म्हणजे अगदी मांजरापेक्षा जास्त राग येतो.
मांजर चोरून दूध पीते.
मी पीत नाही. ( म्हणजे...................... दूध पीत नाही )
पण मी चोरून शेजारच्या मिस चंद्रीकाला दूध देतो.
ह्याचा तुला खूप राग येतो.
खूप म्हणजे अगदी मांजरापेक्षा जास्त राग येतो.
मांजर चोरून दूध पीते.
पण मिस चंद्रिका चोरून दूध पीत नाहीत. खरं तर त्या दूधच पीत नाहीत.
( आणि त्या दारूही पीत नाहीत ).
शेजारच्या मिस चंद्रिका खूप चांगल्या आहेत.
खूप म्हणजे अगदी मांजरीपेक्षा चांगल्या आहेत.
मांजरीकडे पैसे नसतात.
( तू माझे पाकीट लपवून ठेवते तेव्हा त्या मला उसने पैसे देतात. )
त्या कॉफी पितात. त्या मलाही कॉफी प्यायला देतात.
पण मी पीत नाही. ( म्हणजे................................ कॉफी पीत नाही ).
त्यापेक्षा मी त्यांच्याकडून हळूच घेतो. आणि,,,?
त्या मला देतात. .....
हो..............................
आपल्याकडे नसेल तेव्हा त्या मला बर्फ देतात.
आपल्याकडे बर्याचदा बर्फ नसतो.
( कारण तू फ्रीजमध्ये बर्फाच्या ऐवजी शिळ्या पोळ्या ठेवतेस ).
मी वजन कमी करायचं ठरवलंय. म्हणून मी कधी कधी रात्री जेवत नाही.
पण तुला वाटतं की मी दारू चढल्यामुळे जेवत नाही.
त्यामुळे पोळ्या उरतात. त्या तू फ्रीजमध्ये बर्फाच्या ऐवजी ठेवतेस.
त्या पोळ्या तू फ्रीजरमध्ये का ठेवतेस. त्यापेक्षा मांजरीला का देत नाहीस.
मग मीच मांजरीला दूधासह शिळ्या पोळ्या देतो.
मांजर दूध पीते आणि शिळ्या पोळ्या खाते.
मांजर मला खूप आवडते.
( खूप म्हणजे अगदी तुझ्यापेक्षा जास्त आवडते.)