आपल्याला आपल्या रोजच्या आयुष्यात अनेक मूर्ख माणसं भेटत असतात. घरामध्ये, रस्त्यावर, ऑफीसात, बसमध्ये, स्टेशनवर, सरकारी कचेरीत, मित्रांच्या कट्ट्यावर... जिथे जाऊ तिथे वेगवेगळ्या रूपातले मूर्ख त्यांच्यातल्या मूर्खतेसह आपल्या समोर येत रहातात. त्यांच्या वागण्या बोलण्याचा आपल्याला भरपूर त्रास होत असतो. आपण नेमकं काय केलं, कसं वागलं तर हा त्रास कमी होईल याची आपल्याला कधीच टोटल लागत नसते.
आपल्याला होणारा हा त्रास कमी कसा करावा असा प्रश्न तुम्हाला पडतो का? त्याही पुढे जाउन मुळात जगात एवढे मूर्ख का आहेत असा प्रश्न तुम्हाला कधी पडतो का? मला पडतो! गेली अनेक वर्षे पडतो आहे. या प्रश्नावर विचार करताना माझ्या असं लक्षात आलं की जगात मूर्खांची फक्त संख्याच जास्त नसून त्यांच्या मूर्खतेत वैविध्यही बरंच आहे! म्हणजे जगात एकाच प्रकारचे मूर्ख नसून हे जग विविध प्रकारच्या मूर्खांनी भरलेलं आहे. आता विविध प्रकार आहेत कळल्यावर त्याची वर्गवारीही केली पाहिजे ना. तर या विविध प्रकारच्या मूर्खांची वर्गवारी करायचा प्रयत्न केल्यावर माझ्या असं लक्षात आलं की जगात एकूण १२ प्रकारचे मूर्ख आहेत. मला जे प्रकार सापडले त्याच प्रकारचे मूर्ख तुम्हालाही सापडतात का हे तुम्हाला तपासून बघता यावं म्हणून ते प्रकार इथे थोडक्यात मांडतो आहे.
हे प्रकार आपल्या समोर मांडताना मी कोणतही 'शहाणपणाचं' कृत्य करतो आहे असा माझा बिलकुल दावा नाही आणि मांडलेल्या या प्रकारांमधली कोणतीही लक्षणं माझ्यात नाहीत असंही मला सांगायचं नाही. मला वेडाच्या भरात जे सुचलं ते माझ्या मूर्खतेच्या ओघात आपल्याला सांगण्याचा हा एक वेडसर प्रयत्न आहे! हा लेख आणि यातले विचार वाचून आपल्या आयुष्यात कोणताही गुणात्मक बदल होईल असं मला वातत नाही... आणि समजा झालाच तर तो एक निव्वळ योगायोग समजावा!
मूर्खांचे मला समजलेले प्रकार आपल्या समोर मांडताना मी प्रत्येक प्रकाराचं नाव, त्याच्या लक्षणांचं वर्णन करणारा एक छोटा श्लोक आणि त्या प्रकाराची एका वाक्यातली माहिती एवढंच दिलं आहे. मी मुद्दामच सविस्तर वर्णन आणि उदाहरणं दिलेली नाहीत! याचं मुख्य कारण असं की आपल्या सभोवताली आपल्याला हे सर्वच प्रकार नेहमी पहायला मिळतात! चाणाक्ष वाचकांना आपल्याला भेटलेली कोणती व्यक्ती कोणत्या प्रकारची आहे हे नक्कीच कळू शकेल.
आणखी एक गंमत अशी आहे की कोणतीही व्यक्ती ही केवळ एकाच मूर्खांच्या प्रकारामधे असते असं नाही... अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्खतांचं सुरेख मिश्रण प्रत्येक मूर्खामधे असतं! आणि वेगवेगळ्या प्रसंगांमधे आपापल्या भात्यांमधून वेगवेगळे बाण काढून वापरायची क्षमता त्यांच्या जवळ असते!
तर मला वाटणारे मूर्खांचे १२ प्रकार असे
१. पढत मूर्ख
सूर्याशिवाय उन | वाद्याशिवाय धून |
सदसदविवेकहीन | तो पढत मूर्ख |
सूर्याशिवाय उन | वाद्याशिवाय धून |
सदसदविवेकहीन | तो पढत मूर्ख |
अर्थात: पुस्तकी पंडित, नियम, पॉलिसीज इत्यादीवर सतत बोट ठेवून वागणारे, अजिबात साधा कॉमन सेन्स (!) नसलेले..
२. चढत मूर्ख
बुद्धी शिवाय शक्ती | भावाशिवाय भक्ती |
आहे 'सलामसक्ती' | तो चढत मूर्ख |
बुद्धी शिवाय शक्ती | भावाशिवाय भक्ती |
आहे 'सलामसक्ती' | तो चढत मूर्ख |
अर्थात: पंत मेले राव चढले टाईपचे, कुठलेही qualification अथवा गुणवत्ता नसताना सत्तास्थानी असलेले
३. कढत मूर्ख
पारा थरारलेला | झारा उगारलेला |
आत्मा पिसाळलेला | तो कढत मूर्ख |
पारा थरारलेला | झारा उगारलेला |
आत्मा पिसाळलेला | तो कढत मूर्ख |
अर्थात: सदैव भडकलेले, भडकणारे... अंगाचा तीळपापड, तळपायाची आग मस्तकात इत्यादी इत्यादी
४. अडत मूर्ख
ओठी सदैव 'नाही' | पूर्णात न्यून पाही |
करतो न काम काही | तो अडत मूर्ख |
ओठी सदैव 'नाही' | पूर्णात न्यून पाही |
करतो न काम काही | तो अडत मूर्ख |
अर्थात: जमेल तिथे, जमेल तशी, जमेल त्याची अडवणूक करणारे... 'अडवा आणि जिरवा' मधे सुख मिळवणारे
५. गढत मूर्ख
कामास वाहिलेला | कामास बांधलेला |
कामात संपलेला | तो गढत मूर्ख |
कामास वाहिलेला | कामास बांधलेला |
कामात संपलेला | तो गढत मूर्ख |
अर्थात: रत्रंदिवस फक्त काम करणारे... कामाशिवाय दुसरं काहीही सुचत नाही असे... workoholics...
६. मढत मूर्ख
पैशात पोहणारा | सोन्यात नाहणारा |
'श्रीमंत' भासणारा | तो मढत मूर्ख |
पैशात पोहणारा | सोन्यात नाहणारा |
'श्रीमंत' भासणारा | तो मढत मूर्ख |
अर्थात: सतत पैसा पैसा करणारे... आपली श्रीमंती मिरवणारे... त्यातच सगळा आनंद शोधणारे
७. लढत मूर्ख
कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई |
आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख |
कोठेही 'खुट्ट' काही | संताप यास येई |
आंदोलनास जाई | तो लढत मूर्ख |
अर्थात: सदैव कुठल्याही लढाईला तत्पर असलेले... काही झालं की घसा ताणून बोलणारे, बाह्या सरसावणारे... मारामारीला तयार असणारे...
८. रडत मूर्ख
डोळा सदैव पाणी | प्यॅ प्यॅ सदैव वाणी |
गाणी उदासवाणी | तो रडत मूर्ख |
डोळा सदैव पाणी | प्यॅ प्यॅ सदैव वाणी |
गाणी उदासवाणी | तो रडत मूर्ख |
अर्थात: गुळुमुळु मुळुमुळु प्रकारचे.... सतत सतत फक्त रडणारे
९. जडत मूर्ख
आवेग घे दुज्यांचा | आवेशही दुज्यांचा |
नाहीच जो स्वतःचा | तो जडत मूर्ख |
आवेग घे दुज्यांचा | आवेशही दुज्यांचा |
नाहीच जो स्वतःचा | तो जडत मूर्ख |
अर्थात: मूर्खपणाही स्वतःचा नसून दुसर्याचा मूर्खपणा जडलेले!
१०. पडत मूर्ख
भासे सदैव दीन | बोली सदैव न्यून |
म्हणतो स्वतःस हीन | तो पडत मूर्ख |
भासे सदैव दीन | बोली सदैव न्यून |
म्हणतो स्वतःस हीन | तो पडत मूर्ख |
अर्थात: पडखाउ, पडेल वृत्तीचे... सतत स्वतःला कमी लेखणारे
११. गिळत मूर्ख
जो की उगाच चरतो | जे जे दिसेल भरतो |
'खा खा' सदैव करतो | तो गिळत मूर्ख |
जो की उगाच चरतो | जे जे दिसेल भरतो |
'खा खा' सदैव करतो | तो गिळत मूर्ख |
अर्थात: खाण्यासाठी जगणारे!
१२. पिळत मूर्ख
तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ |
ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख|
तोंडी भिजे न तीळ | मारे अफाट पीळ |
ऐकून 'दातखीळ' | तो पिळत मूर्ख|
अर्थात: दिसेल त्याला पकडून सुचेल त्या विषयावर थकेपर्यंत पीळ मारणारे
(यातील सर्व अथवा आपल्याला लागू पडणार्या श्लोकांचं दररोज सकाळ संध्याकाळ नियमित पठण केलं तर मूर्खांपासून आपल्याला होणार्या त्रासाचं एका आठवड्यात निराकरण होतं असा काही भाविकांचा दावा आहे!)
मूर्खतेचं मूळ
मूर्खांचे एवढे नमुने पाहिल्या नंतर मला प्रश्न पडतो की जगात एवढे, एवढ्या प्रकारचे मूर्ख आहेत तरी कशामुळे? या एवढ्या मूर्खतेचं मूळ काय?
प्रत्येक व्यक्ती ही जन्मते, जगते आणि मरण पावते. गेल्या ३० - ४० हजार वर्षांमधे या क्रमामधे काहीएक बदल झालेला नाही. कुठेही जन्म झाला, कशाही प्रकारे जीवन व्यतीत केलं तरी एक ना एक दिवस प्रत्येकजण निश्चितपणे मरण पावतो. तसंच, या विश्वामधे हजारो आकाशगंगा आहेत. प्रत्येक आकाशगंगेत लाखो तारे आणि कोट्यावधी ग्रहमंडलं! या अफाट पसार्यातल्या कुठल्यातरी एका पृथ्वी नावाच्या चिमुरड्या ग्रहावरती, कुठल्याशा चिमुटभर गावात जन्माला येउन आपण काही फार मोठा तीर मारत नाही! आपल्या जगण्यानी या अफाट विश्वामधे काहीएक फरक पडत नाही आणि मरणानी तर नाहीच नाही... असं असूनही आपण स्वतःला या विश्वाच्या केंद्रस्थानी मानतो. आपली अनंत स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, ध्येयं, ईर्षा आणि हव्यास आपण हृदयाशी बाळगून जगत रहातो. आणि आपलं संपूर्ण आयुष्य या हव्यासांच्या मागे धावण्यात घालवतो. पैसा, प्रसिद्धी, सत्ता, मालमत्ता... जे जे काही मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर धावत रहातो ते सारं सारं आपल्याला इथेच ठेवून जावं लागणार असतं. आणि हे असं इथेच सोडावं लागणार आहे हे माहित असूनही ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर झटत रहातो. हेच सार्या मूर्खतेचं मूळ!
पढतमूर्खापासून ते पिळतमूर्खापर्यंत सर्वच मूर्ख काही ना काही मिळवण्याच्या हव्यासापोटीच आपल्यातल्या मूर्खतेचा आविष्कार होवू देत असतात. सार्यांच्या वागण्या बोलण्या मधे या मूलभूत मानवी मूर्खतेची वेगवेगळी रूपं आविष्कृत होत असतात.
आपल्या आजुबाजूला आणि मुख्य म्हणजे आपल्या स्वतःमधे असलेली मूर्खता जर इतकी मूलभूत आणि सर्वव्यापी असेल तर त्यावर उपाय काय? या मूर्खतेतून मुक्त होण्यासाठी मार्ग कोणता?
हे उपाय आणि मार्ग शोधण्याचे माझे प्रयत्न चालू आहेत. सापडलेच तर आपल्याला निश्चित कळवेन! जर तुम्हाला सापडले तर मला कळवायला विसरू नका! ते सापडे पर्यंत स्वतःमधल्या मूर्खतेची संपूर्ण ओळख करून घ्यायची आणि तिच्याशी मैत्री अरून आनंदानं रहायची माझी धडपड सुरू आहे...
No comments:
Post a Comment